Amit Thackeray On NEET Protest: ‘लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला!’; जंतरमंतरवरील लाठीचारावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

NEET पेपरफुटी विरोधातील आंदोलकांवर पोलीस कारवाईचा निषेध; ‘दलाल मोकाट आणि हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांना बेशुद्ध होईपर्यंत मारले’; सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारला घेरले

Amit Thackeray On NEET Protest: नवी दिल्लीतील जंतरमंतरवर NEET परीक्षा पेपरफुटी विरोधात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या घटनेचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत आहेत. ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनीही या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत, “लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला! सत्तेची ही कसली मस्ती आलीये?” अशा थेट आणि तीव्र शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

‘शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांवर लाठ्या चालवल्यात?’

अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. “२० हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या निष्पाप मुलांवर तुम्ही लाठ्या चालवल्यात? बंदुका दाखवून त्यांना अडवलंत? १५-१५ वर्षांच्या मुलांची डोकी फोडली? अश्रूधूर सोडला? देशात लोकशाही उरलीये की निव्वळ दडपशाही सुरू आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘दलाल मोकाट आणि हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांना बेशुद्ध होईपर्यंत मारले’

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रशासनाने केलेल्या दडपशाहीवर ताशेरे ओढताना अमित ठाकरे पुढे म्हणाले:

“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं हा काय गुन्हा आहे का? त्यासाठी शांतपणे रस्त्यावर उतरलेल्या महिला आंदोलकांवर काल पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्या चालवल्या. नाव आणि बॅज नंबर नसलेले जवान आणून तरुणांना अगदी तुडवलं गेलं. सोनम वांगचुक यांच्या पत्नीशी गैरवर्तन केलं गेलं आणि अनेक तरुणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं. पेपर फोडून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे दलाल तुमच्या राज्यात मोकाट फिरतात आणि हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुणाला काल तुम्ही बेशुद्ध होईपर्यंत मारलंत?”

अपयशाची जबाबदारी घेण्याची हिंमत उरलेली नाही

सरकारकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची कोणतीही उत्तरे नाहीत, म्हणूनच पोलीस दलाच्या आडोशाने मुलांची डोकी फोडण्याचे काम केले जात असल्याचा घणाघाती आरोप अमित ठाकरेंनी केला. स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेण्याची हिंमत या सरकारमध्ये उरलेली नाही, म्हणूनच असा अमानुष पोलीस बळाचा वापर केला गेला, असे नमूद करत “लोकांच्या मतांवर निवडून आलेले सरकार असे चालत नसते,” असा सडेतोड सल्लाही त्यांनी सरकारला दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 21-07-2026