Bawankule on Jantar Mantar Protest: ‘कॉकरोच-वॉक्रोचचं आंदोलन म्हणजे मोदी-फडणवीसांना बदनाम करण्यासाठी नौटंकी’: चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान; म्हणाले, “पेपर काय धर्मेंद्र प्रधानांनी फोडला का?”

जंतर-मंतरवरील महापुरावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Bawankule on Jantar Mantar Protest संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे जंतर-मंतर आणि संसद भवन परिसरात आंदोलकांचा अभूतपूर्व उद्रेक पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे भाजप नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आंदोलनावर आणि विरोधकांच्या मागण्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलन आणि विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागण्यांवर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “कॉक्रोच-वॉक्रोचचं हे आंदोलन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी रचलेली निव्वळ नौटंकी आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

‘मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने प्रेरित’

पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “सध्या दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे, ती निव्वळ नौटंकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच हा सगळा बनाव रचला जात आहे. काही तरुण केवळ मनस्तापामुळे किंवा गैरसमजातून यात सहभागी होत आहेत. पण मला सांगा, हा पेपर काय बावनकुळे किंवा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फोडला आहे का? तुम्हाला काही धोरणात्मक सुधारणा सुचवायच्या असतील तर नक्की सुचवा, पण थेट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हे निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे.”

दरम्यान, सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जंतर-मंतर परिसरात तरुणांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.

ऐतिहासिक शेतकरी आंदोलनानंतर ल्युटन्स दिल्ली (Lutyens’ Delhi) परिसरात पहिल्यांदाच एवढा प्रचंड जनसमुदाय आणि आक्रमक वातावरण पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शी व्यक्त करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 20-07-2026