अरबी समुद्रात वसई-विरार किनारपट्टीजवळ ३.२ तीव्रतेचा भूकंप; सुनामीचा धोका नाही, पण किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’
उच्च भरतीच्या लाटांचा ‘अलर्ट’ जारी करण्यात आला असून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांना आवश्यक ती सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांनी अरबी समुद्रात वसई-विरार किनारपट्टीपासून सुमारे ५७ किलोमीटर अंतरावर आणि पाच किलोमीटर खोलीवर कमी तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी होती. या भूकंपाचे धक्के जमिनीवर कुठेही जाणवले नसून कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. तसेच या भूकंपामुळे सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.
इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन्स सर्व्हिसेस (INCOIS) या संस्थेकडून सुनामीचा कोणताही इशारा किंवा अलर्ट जारी केलेला नसल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
२४ तासांचा ‘ऑरेंज अलर्ट’ व सुरक्षेच्या सूचना
अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा २४ तासांचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात समुद्रात मोठ्या भरतीच्या उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मुख्य सूचना:
- मच्छीमारांसाठी: मोठ्या भरतीच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळावे. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नौका, ट्रॉलर आणि मासेमारीचे साहित्य सुरक्षितपणे बांधून ठेवावे.
- पर्यटक व नागरिकांसाठी: किनारपट्टीवरील नागरिक, पर्यटक आणि लहान मुलांनी समुद्रात उतरणे किंवा खडकाळ भागात जाणे पूर्णपणे टाळावे.
आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक
समुद्रात किंवा किनारपट्टीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
- भारतीय तटक्षक दल: १५५४
- किनारी सुरक्षा हेल्पलाइन: १०९३
- राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष: १०७०
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:27 20-07-2026














