Geetanjali Wangchuk: जंतरमंतर ते संसदेवर मोर्चावर अश्रूधुराच्या नळकांड्या; गीतांजली वांगचूक यांची सरकारवर खरमरीत टीका

“आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या”

नवी दिल्लीत NEET UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून वातावरण कमालीचे तापले असून कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जंतरमंतर ते संसद भवनावर विराट मोर्चा काढण्यात आला. देशभरातून हजारो युवकांनी या मोर्चात सहभाग नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली. आंदोलक संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

‘भारताला जगात सर्वोत्तम बनवायचे असेल तर राजीनाम्यापासून सुरुवात करा’

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि NEET घोटाळ्याविरोधात सलग उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांनी आजच्या घडामोडींवर अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. “आमचा लढा हा थेट भ्रष्ट सरकारी व्यवस्थेविरोधात आहे. हे सरकार लोकहिताचे नसून देशात इंटरनेट सेवा खंडित करून दडपशाही करत आहे. भारताची शिक्षण व्यवस्था जगात सर्वोत्तम बनवायची असेल, तर ज्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही, अशा मंत्र्यांच्या राजीनाम्यापासूनच याची सुरुवात व्हायला हवी,” असे स्पष्ट मत गीतांजली वांगचुक यांनी व्यक्त केले.

सोनम वांगचुक यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले, “माझा सध्याच्या कोणत्याही सरकारी यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही. मला सोनम वांगचुक यांना दुसऱ्या सुरक्षित रुग्णालयात हलवायचे आहे. आम्ही केवळ राजकीय विरोधासाठी नाही, तर देशातील युवकांच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या उज्ज्वल भविषणासाठी ठामपणे उभे आहोत.”

संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचले आंदोलक; अश्रूधुराचा वापर

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी पूर्णपणे शांततामय मार्गाने जंतरमंतरवरून मोर्चाला सुरुवात केली होती. या मोर्चाला देशभरातील तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० जुलै रोजी नियोजित असलेल्या या मोर्चामध्ये युवक थेट संसदेच्या गेटपर्यंत धडकले. मात्र, त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाने आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

धर्मेंद्र प्रधान यांच्यावर दबाव वाढला; अमित शाह यांच्यासोबत बैठक

NEET पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता थेट संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी चौफेर दबाव वाढला असून, या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात उच्चस्तरीय चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. हा मुद्दा संसदेत केंद्रस्थानी ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 21-07-2026