Vanchit Maharashtra Bandh: दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून आज ‘महाराष्ट्र बंद’; विविध शहरांत कार्यकर्त्यांची धरपकड व रस्ता रोको

ठाणे, वसई-विरार, विक्रोळीत पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांची धरपकड; अमरावतीत दुकाने बंद तर धाराशिवमध्ये चक्काजाम

Vanchit Maharashtra Bandh: मुंबई :

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुकारण्यात आलेल्या या बंदचा प्रभाव राज्याच्या विविध भागांत पाहायला मिळत आहे. ठाणे, मुंबई आणि वसई-विरार परिसरात पोलीस प्रशासनाने आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे.

ठाणे, मुंबई आणि वसई-विरारमध्ये पोलिसांकडून धरपकड

ठाण्यातील इंदिरानगर भागात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच मुंबईत वंचितचे प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांना विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वसई-विरार भागात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना विरार पूर्व स्थानक परिसरात आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेऊन विरार पोलीस ठाण्यात बसवले. सनदशीर मार्गाने आंदोलन करू देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली, तरीही पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमधील चित्र

छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात पोलिसांनी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. येथे आंदोलनासाठी पोलिसांनी कोणतीही अधिकृत परवानगी दिलेली नाही. शहरात वंचितचे पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, कोल्हापुरात या बंदला डाव्या आघाडीने पाठिंबा दिला आहे. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वंचित आणि डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.

धाराशिवमध्ये चक्काजाम तर अमरावतीत मोर्चाची तयारी

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मसा खंडेश्वरी येथे येरमाळा-कळंब मार्गावर कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अमरावती जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील तिवसा आणि दर्यापूर शहरे सकाळपासून पूर्णतः बंद आहेत. अमरावती शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 23-07-2026