Thackeray Brothers Protest March: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद; नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील कारवाईविरोधात २६ जुलैला महामोर्चाची घोषणा

पत्रकार परिषदेत राज ठाकरे व उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; पोलिसांच्या कारवाईवरून राज ठाकरेंचा गंभीर सवाल

Thackeray Brothers Protest March: मुंबई :

दिल्लीत नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या २६ जुलै (रविवार) रोजी संयुक्त महामोर्चा काढणार असल्याची अधिकृत घोषणा केली. हा मोर्चा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) ते प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढला जाणार आहे.

पोलिसांच्या कारवाईवर राज ठाकरेंचा संताप आणि व्हिडिओचा उल्लेख

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. “सरन्यायाधीशांमुळे झुरळ सुरू झाले, त्यांनी जन्म दिल्यानंतर या मुलाकडे बघायला नको का? महाराष्ट्र पोलीस आंदोलनकर्त्यांना सहकार्य करत आहेत,” असे सांगत त्यांनी एका व्हायरल व्हिडिओचा किस्सा ऐकवला. “माझ्याकडे एक व्हिडिओ आला आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या गाडीतून मुलांना घेऊन जाताना एक पोलीस विद्यार्थ्याला ‘पुन्हा दिसलास तर ५० ग्रॅमची पावडर टाकेन’ अशी धमकी देताना दिसतोय. पोलिसांकडे आता पावडर मिळायला लागली आहे का? पोलीस ड्रग्स सप्लायर आहेत का? काय चालले आहे मला कळत नाही,” असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

जबाबदार मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून यावर सत्ताधाऱ्यांचा उद्दामपणा स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप ठाकरे बंधूंनी केला. “साधी गोष्ट आहे, ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि यापुढे असा प्रकार घडणार नाही याची शाश्वती द्यावी,” अशी ठाम मागणी राज ठाकरे यांनी केली. हा मुद्दा आता केवळ एका मंत्र्यापुरता मर्यादित राहिला नसून थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Tata safari

२६ जुलैला सकाळी ११:३० वाजता निघणार मोर्चा

विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या न्यायासाठी २६ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता शिवतीर्थावरून हा मोर्चा निघेल. केंद्र सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी सिद्धिविनायकाला साकडे घालण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून ठाकरे बंधूंच्या या संयुक्त मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 23-07-2026