जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा; ‘शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने सरकार कोसळणार नाही’
Anna Hazare Letter PM Modi: नवी दिल्ली :
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. अण्णा हजारे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
“शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने सरकार पडणार नाही”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी आंदोलनस्थळावरील पोलीस कारवाई आणि हिंसेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. आंदोलकांच्या रोषाकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता ती समाजाची वेदना आणि अपेक्षा म्हणून पाहिले पाहिजे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास सांगितले तर सरकार कोसळणार नाही; उलटपक्षी, यामुळे सरकारचे कामकाज अधिक जबाबदार आणि प्रभावी ठरेल,” असे स्पष्ट मत अण्णा हजारे यांनी पत्रात मांडले आहे.
विश्वासाचे वातावरण आणि संवादाची गरज
शासनाने आंदोलकांचे म्हणणे संयमाने ऐकून घ्यावे, देशात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे आणि सकारात्मक संवादाच्या माध्यमातून या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी विनंती अण्णांनी सरकारला केली आहे. विशेष म्हणजे, सुमारे १५ वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी याच जंतरमंतरच्या व्यासपीठावरून ऐतिहासिक उपोषण केले होते. या पत्रासोबतच अण्णा हजारे आज मौन आंदोलनही करणार आहेत.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा उल्लेख आणि सरकारला सल्ला
यापूर्वी अण्णा हजारे यांनी लडाखमधील आंदोलक सोनम वांगचुक यांच्या उपोषणालाही पाठिंबा दिला होता. “सरकारने वांगचुक यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये. त्यांच्या मागण्यांवर स्पष्ट उत्तर द्यावे किंवा किमान चर्चा तरी करावी. बळजबरी केल्याने परिस्थिती अधिक बिकट होते, त्यामुळे सरकारने सामंजस्याने आणि चर्चेच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवायला हवेत,” असा महत्त्वाचा सल्लाही अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना दिला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:09 23-07-2026













