Sangmeshwar: धामापूर-करजुवे मार्गावर रामणवाडीत झाड कोसळले; दोन तास वाहतूक ठप्प!

विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर-करजुवे मार्गावर रामणवाडी येथे मुख्य रहदारीच्या रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळीच एक मोठे झाड पडल्याची घटना घडली. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती.

विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल
करजुवे हायस्कूलकडून धामापूरकडे व माखजनवरून करजुवेकडे ये-जा करणाऱ्या अनेक शालेय विद्यार्थ्यांना याचा थेट फटका बसला. ऐन शाळा सुटण्याच्या वेळीच झाड रस्त्यावर आडवे आल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागले.

बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात ग्रामस्थांचा संताप
मागील अनेक दिवसांपासून या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. public works department (बांधकाम विभाग) आणि संबंधित ठेकेदार या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अपघाताची टांगती तलवार
धोकादायक झाडे: मार्गावर अनेक ठिकाणी झाडे रस्त्याच्या दिशेने झुकली असून ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

वाळलेल्या फांद्या: सुकलेल्या झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावर पडत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

खडी उखडली: रस्त्यावरील खडी उखडल्याने मार्ग अधिकच बिकट झाला आहे. रस्त्यालगत वाढलेल्या झुडपांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराने तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी आणि धोकादायक झाडे/झुडपे हटवावीत, अशी ठाम मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 25-07-2026