मृत चालकावर गुन्हा दाखल
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे भरधाव झायलो गाडी पलटी होऊन किंवा झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी झायलो गाडी पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका वर्षाच्या लहान मुलासह एकूण ८ प्रवासी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात मृत चालकाविरोधातच बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परेल ते लांजा प्रवासादरम्यान पहाटे घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना ७ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता संगमेश्वर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये दीपक नारायण पवार (वय ५१ वर्षे, रा. माऊली अपार्टमेन्ट, परेल, मुंबई) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
आरोपी चालक रोहित चांदणे हा आपली झायलो गाडी (क्रमांक MH-43 AB 2332) घेऊन मुंबईतील परेल येथून लांजा तालुक्यातील हर्चे बेनी या गावाकडे जात होता. आरवली परिसरात आला असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी अत्यंत हयगयीने व बेदरकारपणे चालविल्यामुळे पलटी झाली.
अपघातात १ वर्षाच्या बालकासह ८ प्रवासी गंभीर जखमी
या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर गाडीतील पुढील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले:
- दीपक नारायण पवार (वय ५१ वर्षे, रा. परेल, मुंबई)
- ज्योती दीपक पवार (वय ४६ वर्षे, रा. परेल, मुंबई)
- समर्थ दीपक पवार (वय १ वर्ष, रा. परेल, मुंबई)
- दीपक सदाशिव सर्वे (रा. परेल, मुंबई)
- दीप्ती दीपक सर्वे (रा. परेल, मुंबई)
- धनश्री दीपक सर्वे (वय १६ वर्षे, रा. परेल, मुंबई)
- दिपाली दत्ताराम चांदणे (वय ५८ वर्षे, रा. नालासोपारा, जि. पालघर)
- हर्षाली रोहित चांदणे (वय ५ वर्षे, रा. नालासोपारा, जि. पालघर)
तपासानंतर मृत चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या अपघात रजिस्टर नंबर २९/२०२६ मधील तपासाअंती आणि पीडितांच्या तक्रारीवरून उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील सविस्तर तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबत नसल्याने प्रवाशांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 25-07-2026














