Public Examinations Bill वरून दोन्ही सभागृहात गोंधळ: दोषींना १० वर्षे जेल आणि १० कोटी दंडाची तरतूद
नवी दिल्ली:
देशात प्रचंड गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार गदारोळ पाहायला मिळत आहे. विरोधकांच्या प्रचंड गदारोळातच केंद्र सरकारने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी Public Examinations Bill (सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक) संसदेत सादर केले. मात्र, ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या खासदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.
पेपरफुटी मफिया व कंपन्यांवर कठोर कारवाईची तरतूद
देशभरातील परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी Public Examinations Bill लोकसभेत सादर केले. या प्रस्तावित विधेयकाच्या माध्यमातून पेपरफुटीतील मफियांवर आणि टोळ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या विधेयकातील तरतुदींनुसार, परीक्षा घेणारी किंवा सेवा पुरवणारी कंपनी गैरप्रकारात दोषी आढळल्यास तिला पुढील ८ वर्षांसाठी काळ्या यादीत (Blacklist) टाकले जाईल. तसेच या प्रकरणांमधील दोषींना तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० कोटी रुपयांच्या दंडाच्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
संसदेत जोरदार घोषणाबाजी; १२ ते २ वाजेपर्यंत कामकाज ठप्प
हे विधेयक सादर करण्यापूर्वीच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराविरोधात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. वाढत्या गदारोळामुळे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रथम १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.
दुपारी १२ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक सादर केले. मात्र, विरोधकांची निदर्शने सुरुच राहिल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी विधेयकावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तरीही गोंधळ न थांबल्याने कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
संसद परिसरात ‘इंडिया’ आघाडीचे फलकांसह प्रदर्शन
सभागृहात कामकाज तहकूब झाल्यानंतर ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात जोरदार निदर्शने केली. विरोधकांच्या हातात मतचोरीपासून ते विविध मुद्द्यांवरील घोषणा लिहिलेले फलक आणि बॅनर होते. नीट पेपरफुटीमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरकार यावर चर्चा टाळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 27-07-2026














