Ratnagiri : रत्नागिरी मुख्य बाजारपेठेत दोन मद्यप्यांचा धिंगाणा; रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडल्याने वाहतूक ठप्प

वर्दळीच्या मार्गावर तळीरामांचा ड्रामा; महिला आणि वृद्धांना मोठा मनस्ताप

रत्नागिरी:

रत्नागिरी शहरातील सर्वात गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत आज सायंकाळी दोन मद्यधुंद व्यक्तींनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्यामुळे काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला. भररस्त्यात घडलेल्या या विचित्र आणि बेजबाबदार प्रकारामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

रस्त्याच्या मधोमध निवांत ठिय्या; वाहतुकीचा बोजवारा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मद्याच्या नशेत धुंद असलेल्या दोन तळीरामांपैकी एकजण थेट रस्त्याच्या मध्यभागी निवांत बसून राहिला होता, तर दुसरा स्वतःच्याच धुंदीत रस्त्याच्या मधोमध फिरत होता.

संध्याकाळच्या वेळी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा अत्यंत वर्दळीच्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी चाललेल्या या नाट्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक मंदावली आणि काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली.

Radhakrushna patapedhi

पोलीस प्रशासनाच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह; नागरिकांची कारवाईची मागणी

घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या संपूर्ण प्रकाराची निव्वळ करमणूक म्हणून मजा पाहिली. मात्र, बाजारात आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या अव्यवस्थेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

विशेष म्हणजे, शहरातील सर्वाधिक गर्दीच्या आणि महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावर हा सर्व प्रकार घडत असताना त्या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस किंवा पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अशा बेजबाबदार तळीरामांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मुख्य बाजारपेठेत प्रभावी गस्त वाढवावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 27-07-2026