Yogesh Kadam on Ratnagiri Drought: शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये; राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीर – राज्यमंत्री योगेश कदम

Yogesh Kadam on Ratnagiri Drought: शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये; राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीर - राज्यमंत्री योगेश कदम

रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वरसह बाधित तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा; ५ ते ६ दिवसांत पंचनाम्यांचे निर्देश

रत्नागिरी : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी निराश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन करत त्यांनी दुष्काळ निवारणासाठी आगामी ८ ते ९ महिन्यांचे ठोस आणि काटेकोर नियोजन सुरू असल्याचे सोमवारी स्पष्ट केले.

८ ते ९ महिन्यांसाठी पाणी अन् चाऱ्याचे नियोजन

मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीवर बोलताना राज्यमंत्री कदम म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना केवळ तातडीची आर्थिक मदत देऊन भागणार नाही, तर पुढील ८ ते ९ महिन्यांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि इतर आवश्यक बाबींचे नियोजन करण्यात येत आहे. अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळ पडू शकतो याचा अंदाज शासनाला आधीपासूनच होता, त्यामुळे पूर्वतयारी केली गेली आहे.

Tata tiago

केवळ पावसाची आकडेवारी नाही, तर वस्तुस्थिती पाहून निर्णय

कोकणातील दुष्काळसदृश परिस्थितीबाबत बोलताना श्री. कदम यांनी स्पष्ट केले की, एखाद्या भागात सरासरी पाऊस केवळ मोजक्या दिवसांत पडला आणि नंतरचे तीन महिने कोरडे गेले, तर तेथे दुष्काळ नाही असे म्हणता येणार नाही. त्यामुळे केवळ पावसाच्या मिलिमीटरची आकडेवारी न पाहता प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासून दुष्काळग्रस्त भाग निश्चित केला जात आहे.

रत्नागिरीतील बाधित तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वर या तालुक्यांसह ज्या ज्या ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे, त्या सर्व तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त भागात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही यावर चर्चा झाली असून, बाधित पिकांचे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील ५ ते ६ दिवसांत परतीचा पाऊस न पडल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांना सर्वतोपरी शासकीय मदत व भरपाई मिळवून दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.