Ratnagiri Cyber Crime: रत्नागिरीत चार्टर्ड अकाउंटंटची ५.६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक; मोबाईल हॅक करून परस्पर काढले पैसे

Ratnagiri Cyber Crime: रत्नागिरीत चार्टर्ड अकाउंटंटची ५.६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक; मोबाईल हॅक करून परस्पर काढले पैसे

वडिलांचा मोबाईल हॅक करून मिळवले डेबिट कार्ड; संयुक्त खात्यातून परस्पर पैसे ट्रान्सफरसह भरले क्रेडिट कार्डचे बिल

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील तेली आळी परिसरातील ज्यतिका अपार्टमेंटमधील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका ५७ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटची (CA) तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैशांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अज्ञात भामट्याने फिर्यादीच्या वडिलांचा मोबाईल हॅक करून त्याद्वारे कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड मिळवले आणि बँकेच्या संयुक्त खात्यातून परस्पर रक्कम लांबवली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाईल हॅक करून डेबिट कार्ड केले इश्यू

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, विपिन रसिकलाल शहा (वय ५७, व्यवसाय- चार्टर्ड अकाउंटंट, रा. बन्सी बंगला, पार्क ओपल, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.१४ ते ८.३७ वाजण्याच्या सुमारास ही फसवणूक घडली. फिर्यादी विपिन शहा हे तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमधील आपल्या कार्यालयात असताना भामट्यांनी त्यांच्या वडिलांचा मोबाईल हॅक केला आणि त्याआधारे कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड मिळवून घेतले.

Shanti2

संयुक्त खात्यातून २ लाख ट्रान्सफर; ३.६६ लाखांचे भरले क्रेडिट कार्ड बिल

अज्ञात सायबर गुन्हेगाराने हे डेबिट कार्ड मिळवल्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांच्या कॅनरा बँकेतील संयुक्त खात्यातून २ लाख रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. एवढ्यावरच न थांबता मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैशांचे क्रेडिट कार्डचे बिलही भरून घेतले. अशा प्रकारे काही मिनिटांत ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे रकमेचा चुना लावण्यात आला.

शहर पोलिसांत गुन्हा दाखल; तपास वेगात

फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी दुपारी २.१९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७५/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (क) व ६६ (ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मोबाईल हॅकिंग व ऑनलाइन व्यवहाराचे धागेदोरे शोधण्यासाठी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.