Chiplun Electrocution : आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; चिपळूणमध्ये दुर्दैवी घटना

खांदाटपाली येथील घराच्या पडवीत घडली दुर्घटना

रत्नागिरी : Chiplun Electrocution प्रकरणात चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली-भुवडवाडी येथे आईला विजेच्या धक्क्यातून वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी सकाळी घडली असून लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

आईला शॉक लागल्याचा आवाज ऐकून मुलगा धावला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताची आई चंद्रकला या घराच्या पडवीत वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेल्या असता त्यांना लोखंडी तारेचा विजेचा धक्का बसला. त्यांनी मदतीसाठी आवाज दिल्यानंतर त्यांचा मुलगा अक्षय चंद्रकांत मेगे (वय ३१, रा. खांदाटपाली, भुवडवाडी, ता. चिपळूण) हा तातडीने पडवीत गेला.

त्यावेळी आई जमिनीवर पडलेली दिसल्याने तिला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना अक्षय यालाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि तोही खाली कोसळला.

रुग्णालयात नेले; उपचारापूर्वीच मृत घोषित

अक्षयच्या ओरडण्याचा आवाज ऐकून संजय बाबू भुवड हे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी अक्षयचा श्वास सुरू असल्याने त्याला तातडीने सकाळी सुमारे ८.३० वाजता चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सकाळी ९.०५ वाजता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

आकस्मिक मृत्यूची नोंद

या घटनेची चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४९/२०२६ अशी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची परिस्थिती याबाबत पुढील तपास सुरू आहे.