२२ पैकी ४ शाळा आधीच बंद; अद्ययावत सुविधा आणि दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन करण्याची तयारी
रत्नागिरी शहरात नगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्राला मोठी घरघर लागल्याचे समोर आले आहे. खासगी शाळांचे वाढते आकर्षण आणि पालिका शाळांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पटसंख्या प्रचंड घटली असून पालिका शाळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पालिकेच्या एकूण २२ शाळांपैकी चार शाळा यापूर्वीच बंद पडल्या असून आता उर्वरित १८ पैकी अत्यल्प पटसंख्या असलेल्या पाच शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना लगतच्या शाळांमध्ये वर्ग करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. नगर परिषद शिक्षण मंडळाच्या अहवालानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर गंभीर चर्चा झाली.
चार शाळा आधीच पडल्या बंद; बहुतांश शाळांमध्ये ५० पेक्षा कमी विद्यार्थी
रत्नागिरी नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ४ (कन्या शाळा), शाळा क्रमांक १४, ११ आणि १६ या चार शाळा विद्यार्थीसंख्येअभावी याआधीच बंद कराव्या लागल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या १८ शाळांपैकी केवळ ७ शाळांमध्ये ५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पाच शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षाही कमी आहे, तर उर्वरित शाळांची अवस्थादेखील अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे पालिका शिक्षण मंडळाच्या बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना लगतच्या मोठ्या शाळांमध्ये समाविष्ट करण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रशासनाकडून अभ्यासाअंती निर्णयाचे आश्वासन
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना लगतच्या मोठ्या शाळांमध्ये वर्ग केल्यास सर्व विद्यार्थ्यांवर एकाच ठिकाणी शैक्षणिक व प्रशासकीयदृष्ट्या अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. या निर्णयामुळे काही परिसरातील सामान्य घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि शाळा बंद करण्याबाबत संपूर्ण अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.
मध्यवर्ती शाळांच्या दुरुस्तीवर भर आणि अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न
पालिकेच्या बहुतांश शाळांच्या इमारती सध्या मोडकळीस आल्या आहेत. सर्वच इमारतींवर तुटपुंजा निधी खर्च करत राहण्याऐवजी काही ठराविक मध्यवर्ती शाळांची निवड करून त्यांच्या इमारतींची डागडुजी व दुरुस्ती करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. या निवडक शाळांमध्ये अद्ययावत डिजिटल सुविधा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य आणि दर्जेदार व्यवस्था उपलब्ध करून देऊन पालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देता योग्य निर्णय घेणार: नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे
शाळांची घसरती पटसंख्या ही अत्यंत गंभीर बाब आहे. परंतु, या प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, उलट त्यांना अधिक चांगले आणि दर्जेदार शिक्षण कसे मिळेल, या दृष्टीने संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन रत्नागिरी पालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिले आहे.













