रत्नागिरीतील ऐतिहासिक स्मारकात पत्रकारांचा निर्भीड पत्रकारितेचा वारसा जपण्याचा संकल्प
रत्नागिरी: लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या औचित्याने भारतीय असंतोषाचे जनक, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रखर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार ‘लोकमान्य’ बाळ गंगाधर टिळक यांना रत्नागिरीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. आज शनिवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ९ वाजता रत्नागिरीतील ऐतिहासिक ‘टिळक आळी’ येथील ‘लोकमान्य टिळक स्मारकात’ हा अभिवादन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या स्मारकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली. याप्रसंगी उपस्थितांनी लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या अतुलनीय योगदानाचा आणि ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून देशभरात पेटवलेल्या वैचारिक क्रांतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. लोकमान्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून लोकजागृतीचे जे उत्तुंग कार्य केले, ते आजही देशातील प्रत्येक पत्रकारासाठी दीपस्तंभ आणि मार्गदर्शक आहे, अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या.
अभिवादन सभेदरम्यान उपस्थित पत्रकारांनी लोकमान्यांच्या निर्भीड, समाजोपयोगी आणि राष्ट्रहित जपणाऱ्या पत्रकारितेचा वारसा पुढे चालवण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करण्याचा दृढ संकल्प केला. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी लोकमान्य टिळकांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञतापूर्वक नमन करून अभिवादन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 01-08-2026














