Kangana Ranaut Hrithik Roshan Controversy: हृतिकच्या ‘त्या’ पोस्टनंतर कंगना आक्रमक; सबा आझादचा उल्लेख करत टोला

‘सॉरी हृतिक’ ट्रेंडवर हृतिक रोशनची प्रतिक्रिया अन् कंगना रणौतचा सोशल मीडियावर जोरदार पलटवार

मुंबई:

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा पेटला आहे. सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असलेल्या ‘We Owe Hrithik Roshan an Apology’ या ट्रेंडवर हृतिकने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर कंगनाने त्याला सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी कंगनाने हृतिकची सध्याची पार्टनर सबा आझाद (Saba Azad) हिचाही स्पष्ट उल्लेख करत हृतिकवर निशाणा साधला.

‘कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहात, महिलेला टोमणे मारणे अयोग्य’: कंगना रणौत

सोशल मीडियावर सुरू असलेल्या या वादावर पलटवार करताना कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “प्रिय हृतिक, तुला तुझी योग्य जोडीदार मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे. तू आणि सबा आझाद एकत्र खूप छान दिसता. तुम्ही सध्या एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहात. अशा परिस्थितीत एका महिलेची अशा प्रकारे खिल्ली उडवणे तुला शोभत नाही. त्याऐवजी तुझ्या नावाचा गैरवापर करून मला ट्रोल आणि बुली करणाऱ्यांचा तू निषेध करायला हवा होतास.”

यापुढे बोलताना कंगनाने हृतिकला थेट सल्ला देत लिहिले, “आगीत तेल ओतणे थांबव आणि तुझ्या पार्टनरला लाज वाटेल असे वर्तन करू नकोस. तुला योग्य गोष्ट समजेल आणि विनाकारण बोलणे थांबवशील, अशी मला आशा आहे.”

‘सॉरी हृतिक’ ट्रेंड नेमका कसा सुरू झाला?

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर अभिनेत्री कंगना रणौतने ‘Gen Z’ पिढीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून कंगना आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सौरव दास यांनी मिश्कील टिप्पणी करत म्हटले, “माझे मित्र म्हणतात की मी तरुणपणीच्या हृतिक रोशनसारखा दिसतो, बहुतेक म्हणूनच कंगना माझ्यावर टीका करत आहे.”

सौरव दास यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ‘We Owe Hrithik Roshan an Apology’ हा ट्रेंड वेगाने सुरू झाला. या ट्रेंडवर इन्फ्लुएंसर फ्रेडी बर्डीने पोस्ट केली असता, हृतिकने त्यावर कमेंट केली. हृतिकने लिहिले, “फक्त आता तुम्हाला ‘B’ आवडत नाही म्हणून ‘A’ची बाजू घेणे, ही आपल्या समाजातील मोठ्या समस्येचा एक भाग आहे. योग्य संदर्भ आणि तथ्यांसह चर्चा होईल, त्या दिवसाची मी वाट पाहीन.” हृतिकच्या याच प्रतिक्रियेवर कंगनाने आता पुन्हा एकदा पलटवार केला आहे.

२०१६ मधील वाद आणि कायदेशीर कारवाईची पार्श्वभूमी

कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वादाची सुरुवात २०१६ मध्ये झाली होती. कंगनाने हृतिकवर पाठलाग केल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत मानहानीचा दावा दाखल केला होता. तसेच, आपण दोघांनी रिलेशनशिपमध्ये होतो असा दावा कंगनाने केला होता.

मात्र, हृतिकने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणात कायदेशीर तपास सुरू असताना हृतिकने आपला पासपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासासाठी जमा केली होती; तर दुसरीकडे कंगनाने तिची उपकरणे पाण्यात खराब झाल्याचे सांगत तपास यंत्रणेकडे सोपवली नव्हती. आता तब्बल १० वर्षांनंतर हा वाद पुन्हा सोशल मीडियावर उफाळून आला आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 03-08-2026