रत्नगिरी नगरपरिषद शाळा पटसंख्या: केवळ ७ शाळांची पटसंख्या ५० पेक्षा अधिक, ४ शाळा बंद तर आणखी ६ शाळा बंद होण्याच्या मार्गावर

पटसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये वर्ग करण्याचे नियोजन सुरू


रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी:

रत्नागिरी नगरपरिषद शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांमधील घटती पटसंख्या आता चिंतेचा विषय बनली आहे. नगरपरिषदेच्या एकूण २२ प्राथमिक शाळांपैकी केवळ ७ शाळांचीच पटसंख्या ५० पेक्षा अधिक आहे. तर दुसरीकडे अपेक्षेपेक्षा कमी पटसंख्येमुळे गेल्या अनेक वर्षांपासून ४ शाळा यापूर्वीच कायमच्या बंद झाल्या आहेत. सध्या आणखी ६ शाळांमधील पटसंख्या २० पेक्षा कमी झाल्यामुळे या शाळाही बंद होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, तेथील विद्यार्थ्यांना लगतच्या शाळांमध्ये वर्ग करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.

विद्यार्थीसंख्येच्या अभावामुळे ४ शाळा यापूर्वीच बंद
रत्नागिरी नगरपरिषदेच्या एकूण २२ शाळांपैकी शाळा क्र. ४, १४, ११ आणि १६ या चार शाळा अनेक वर्षांपूर्वी विद्यार्थीसंख्येच्या अभावामुळे कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने प्रशासन पातळीवर हा निर्णय घेण्यात आला होता. आता उर्वरित शाळांपैकी ५ शाळांची पटसंख्या ५० च्या आत आहे, तर ६ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी विद्यार्थी राहिले असल्याने या शाळा देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

जवळच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे होणार स्थलांतर
रत्नागिरी शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना, अनेक जुन्या शाळा नव्या रूपात येत आहेत. मात्र, जर विद्यार्थीच नसतील तर अशा जुन्या शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीवर होणारा नाहक खर्च टाळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत. कमी पटसंख्या असलेल्या ६ शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लगतच्या आणि जवळ असणाऱ्या शाळांमध्ये वर्ग केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 03-08-2026