गुहागर पंचायत समिती सभापतींकडून घटनास्थळाची पाहणी; पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नवीन पुलासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन
गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखत गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बाधित ग्रामस्थांशी संवाद साधत प्रशासनाला तातडीने नवीन पुलाचे इस्टिमेट तयार करून सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. तसेच, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नवीन पूल लवकरात लवकर मंजूर करून त्याचे काम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
लोखंडी साकव कोसळून बैलाचा मृत्यू; १० ते १२ गुरे जखमी
सोमवारी सायंकाळी कुटगिरी येथील नदीवरील जुना लोखंडी साकव अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात १० ते १२ गुरे जखमी झाली, तर दुर्दैवाने एका बैलाचा मृत्यू झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी टळली असली, तरी ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पीडित शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत; पंचनामे पूर्ण
दुर्घटनेची बातमी मिळताच सभापती प्रणव पोळेकर यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. जखमी जनावरांवर त्वरित वैद्यकीय उपचार करणे आणि मृत जनावराच्या मालकाला शासकीय नियमांनुसार तातडीने मदत देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्रांताधिकारी व तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे पूर्ण केले असून बाधित शेतकऱ्याला शासकीय मदत सुपूर्द करण्यात आली आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडून पाहणी
या दुर्घटनेनंतर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर सायंकाळी सभापती प्रणव पोळेकर यांनी स्वतः अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. या वेळी डेप्युटी इंजिनिअर आशुतोष सरदेसाई, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांच्यासह संबंधित शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुटगिरी ग्रामस्थांच्या दैनंदिन दळणवळणासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने, नवीन पुलाचे काम कोणत्याही विलंबाशिवाय तातडीने सुरू होण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा शब्द सभापती प्रणव पोळेकर यांनी शेवटी ग्रामस्थांना दिला.














