ओपन टेरेसवरून १ लाख ८५ हजार रुपयांच्या पर्सनेट व नायलॉन जाळ्यांची चोरी; पोलिसांकडून तपास सुरू
रत्नागिरी: Rajiwada Ratnagiri Theft: रत्नागिरी शहर परिसरातील राजीवडा नाका येथील एका घराच्या ओपन टेरेसवरून मासळी पकडण्याची महागडी जाळी अज्ञात चोराने लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओपन टेरेसवरून १,८५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चोरीचा प्रकार १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते १५ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडला. फिर्यादी इम्रान कमरुद्दीन मुल्ला (रा. घर नं. २१९, राजीवडा निवखोल, ता. जि. रत्नागिरी) यांची मच्छी पकडण्याची जाळी त्यांचे सासरे मकबूल मोहम्मद मोतीवाले (रा. घर नं. १३४५, राजीवडा नाका, ता. जि. रत्नागिरी) यांच्या घराच्या ओपन टेरेसवर ठेवण्यात आली होती. दरम्यानच्या काळात अज्ञात व्यक्तीने फिर्यादींच्या संमतीशिवाय चोरीच्या इराद्याने ही जाळी लांबवली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालात १ लाख ३५ हजार रुपये किमतीची ३०० किलो वजनाची, लाल रंगाची पर्सनेट नायलॉन धाग्याची जाळी आणि ५० हजार रुपये किमतीची ५०० किलो वजनाची, हिरव्या रंगाची नायलॉन धाग्याची जाळी अशा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांच्या जाळ्यांचा समावेश आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
या घटनेबाबत इम्रान मुल्ला यांनी ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेची माहिती मिळण्यास आणि तक्रार देण्यास उशीर झाल्यामुळे उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३ (२) तसेच भारतीय दंड संहिता (IPC) ३७९ नुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस अज्ञात चोराचा शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 05-08-2026














