Khed MSRTC Molestation News: एसटी वाहकाकडून विद्यार्थिनीची छेडछाड; वाहक सेवेतून निलंबित

छेडछाड करून पाठलाग करत मागितला नंबर; पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

खेड: Khed MSRTC Molestation News (खेड एसटी बसमधील छेडछाड प्रकरण): खेड तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची एसटी बसमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी वाहक (कंडक्टर) बी. डी. गोचडे याच्यावर एसटी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी संशयित वाहकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बसमध्ये छेडछाड अन् उतरल्यावर नंबर मागण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शुक्रवारी सकाळी खेड आगाराच्या बसमधून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान वाहक बी. डी. गोचडे हा तिच्याकडे वैयक्तिक माहिती विचारत तिची छेडछाड करत होता.

या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनी आपल्या आसनावरून उठून बाजूला उभी राहिली. ती बसमधून खाली उतरल्यानंतरही वाहकाने तिचा पाठलाग केला आणि तिचा मोबाईल नंबर मागण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

प्राचार्यांकडे दाद; संजय कदम यांची बस स्थानकात धाव

घडलेला हा संतापजनक प्रकार पीडित विद्यार्थिनीने थेट आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यांच्या कानावर घातला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना उपनेते संजय कदम यांनी तत्काळ खेड बस स्थानक गाठले.

त्यावेळी स्थानकप्रमुख अनुपस्थित असल्याने व आगारप्रमुखांना येण्यास विलंब झाल्याने संजय कदम यांनी एसटी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही बस स्थानकात धाव घेतली.

संशयित वाहक सेवेतून निलंबित; पोलिसांकडून कारवाई

घटनेची गंभीर दखल घेत खेड आगारप्रमुखांनी तातडीने सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. त्या अहवालानुसार विभागीय वाहतूक नियंत्रकांनी वाहक बी. डी. गोचडे याला तातडीने सेवेतून निलंबित केले.

दरम्यान, सेवा बजावण्यासाठी चिपळूण येथे गेलेल्या संशयित वाहकाला एसटी प्रशासनाने खेड बस स्थानकात परत बोलावून घेतले. वाहक दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले. पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:43 08-08-2026