Ranbhaji Mahotsav Ratnagiri: रत्नागिरीत १४ ऑगस्टला जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा; जाणून घ्या वेळापत्रक आणि नियम

रानभाजी महोत्सव रत्नागिरी अंतर्गत नागरीकांसाठी विविध स्पर्धा; कृषी विभाग व ‘आत्मा’चा उपक्रम

रत्नागिरी: Ranbhaji Mahotsav Ratnagiri म्हणजेच जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धेचे आयोजन १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता देसाई बँक्वेट हॉल, विवेक हॉटेल, माळनाका, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. कोकणातील निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या पौष्टिक रानभाज्यांचे महत्त्व शहरी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि ग्रामीण भागातील बळीराजाला आर्थिक लाभ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १५ ऑगस्टदरम्यान तालुका व जिल्हा स्तरावर या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.

कोकणात पावसाळ्यात कोणत्याही लागवडीशिवाय, रासायनिक खतांशिवाय आणि कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय अनेक औषधी रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवतात. यामध्ये भारंगी, डिंडा, कुरडू, केना, कुड्याच्या शेंगा, आघाडा, टाकळा, अंबाडी, पानाचा ओवा, कपाळफोडी यांसारख्या विविध भाज्यांचा समावेश आहे. या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे (अ, ब, क, इ), खनिजे, प्रथिने आणि तंतूमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच त्यांचे उष्मांक (कॅलरीज) मूल्य कमी असल्याने त्या मधुमेहींसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. काळाच्या ओघात कमी होत चाललेला या भाज्यांचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांना थेट विक्रीतून आर्थिक फायदा मिळवून देणे ही यामागची मुख्य संकल्पना आहे.

Ranbhaji Mahotsav Ratnagiri: रील आणि पाककला स्पर्धेचे आयोजन

या महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रानभाजी रील स्पर्धेसाठी नोंदणी कालावधी १२ ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण १४ ऑगस्ट रोजी महोत्सवादरम्यान विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देऊन केले जाईल. रील स्पर्धेच्या माहितीसाठी वैभव आमरे आणि अमोल सपकाळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत रानभाजी पाककला स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेत उत्कृष्ट पाककला कृतींचे नमुने सादर करणाऱ्या स्पर्धकांची निवड करून त्यांना बक्षीसे दिली जातील. पाककला स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी हर्षला पाटील (९४२२४४१५७१) व नेहा पवार यांच्याशी संपर्क साधता येईल.

या जिल्हास्तरीय महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच तालुकास्तरीय कार्यक्रमांना स्थानिक आमदार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी तसेच रील व पाककला स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतिवार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 08-08-2026