JPSC व JSSC घोटाळ्याविरोधात विद्यार्थी आक्रमक; एल. ख्यांगते यांना सीआयडीकडून बेड्या
रांची: JPSC Exam Scam आणि JSSC भरती प्रक्रियेतील कथित घोटाळा व पेपरफुटीप्रकरणी झारखंडची राजधानी रांची येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्र झाले आहे. विद्यार्थ्यांच्या ‘विधानसभा मार्च’दरम्यान जोरदार गदारोळ झाला असून, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत पाण्याच्या फवाऱ्यांचा (Water Cannon) मारा केला. दुसरीकडे, या घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून सीआयडीने (CID) जेपीएससीचे (JPSC) माजी अध्यक्ष एल. ख्यांगते यांना बेड्या ठोकल्या आहेत.
भरती प्रक्रियेतील अनियमितता आणि वाढत्या दबावामुळे एल. ख्यांगते यांनी कालच आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सीआयडीने यापूर्वी त्यांची चार वेळा कसून चौकशी केली होती. राजीनामा दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सीआयडीने ही मोठी कारवाई करत त्यांना अटक केली.
विधानसभेला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते देवेंद्र महतो यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. “आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस असताना विद्यार्थ्यांना अश्रूधूर आणि वॉटर कॅनॉनची भेट देऊन सरकार राज्याला कलंकित करत आहे. हा जनसमुदाय पाहून सरकार घाबरले आहे. आता आम्ही कोणत्याही शिष्टमंडळाशी नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करणार आहोत,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, सरकार आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत सरकारने १४ वी जेपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच विवादित ‘टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड’ एजन्सीची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची मुख्य मागणी फेटाळत सरकारने केवळ न्यायिक चौकशीचे आश्वासन दिले.
शासकीय समितीने ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला तरी विद्यार्थ्यांनी तो पूर्णपणे फेटाळून लावला आहे. १३ पैकी केवळ ३ परीक्षा रद्द करण्यास सरकारने संमती दिल्याने विद्यार्थ्यांमधील असंतोष अधिकच ताणला गेला असून आंदोलकांनी आता सर्वसामान्य जनता व राजकीय पक्षांचा पाठिंबा मागितला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:10 10-08-2026














