देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना का भेटले नाहीत? : भास्कर जाधव

राज्य सरकारच्या भूमिकेवर भास्कर जाधवांचा हल्लाबोल; परभणी घटनेवरून ३०२ च्या गुन्ह्याची मागणी

Maratha Reservation Manoj Jarange मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशासह कुणबी जात प्रमाणपत्रांच्या अंमलबजावणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून मराठा आरक्षणासाठी आता ‘आरपारची लढाई’ लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेदेखील ‘ओबीसी हक्क बचाव’ची भूमिका घेत जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत असल्याने राज्यात पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा सामाजिक संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदी आणि जात प्रमाणपत्रांवरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. “मिळालेल्या कुणबी नोंदींच्या आधारे दिलेली जात प्रमाणपत्रे रद्द करणे ही आपली चूक होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे मान्य करावे. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत झालेली चूक सुधारण्याचे आश्वासन दिले, तशीच स्पष्ट भूमिका फडणवीस का घेत नाहीत? त्यांना संपूर्ण मराठा समाजाचा रोष अंगावर घ्यायचा आहे का?” असा थेट सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “सरकारकडून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लोकांना पुढे करून जरांगे पाटील यांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. सर्व राजकीय पक्षांचे नेते जरांगे यांना भेटले, परंतु देवेंद्र फडणवीस आजवर त्यांना का भेटले नाहीत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच आंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली.

दरम्यान, परभणी येथे १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे आई आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेवरही भास्कर जाधव यांनी प्रशासनाला जबाबदार धरले. “ही घटना सरकारच्या अत्यंत बेजबाबदार आणि हलगर्जी कारभारामुळेच घडली आहे. त्यामुळे या प्रकरणी सरकारवर कलम ३०२ अंतर्गत थेट गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे,” अशी मागणी करत त्यांनी महाराष्ट्र सध्या काळजीवाहू नव्हे तर ‘केअरलेस’ लोकांच्या आणि प्रशासनाच्या हातात असल्याची घणाघाती टीका केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:11 10-08-2026