अल-निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज
Maharashtra Monsoon Update: मान्सून हंगाम मध्यावर आलेला असताना देशातील हवामानात मोठी विषमता दिसून येत आहे. मान्सूनच्या पहिल्या ६५ दिवसांत देशात सरासरी ११ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. या परिस्थितीत गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र ही तीन राज्ये कशीबशी सरासरी गाठत ‘काठावर पास’ झाली असून उर्वरित बहुतांश राज्यांवर अल-निनोचा मोठा प्रभाव दिसून येत आहे.
हवामान विभागाने १ जून ते ८ ऑगस्ट या ६५ दिवसांच्या मान्सून हंगामाचा ताळेबंद प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार देशाच्या ४३ टक्के भू-भागावर कमी, तर १७ टक्के भागात खूप कमी पाऊस झाला आहे. देशातील १४ राज्यांसह लक्षद्वीप बेट हे अवर्षणग्रस्त म्हणजेच ‘रेड झोन’मध्ये गेले आहे. यामध्ये पंजाब, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.
विभागवार आकडेवारीनुसार, ईशान्य भारतात सर्वाधिक २६ टक्के पावसाची तूट झाली आहे. दक्षिण भारतात १८ टक्के, तर उत्तर भारतात १० टक्के तूट नोंदवली गेली आहे. मध्य भारतात मात्र सरासरीइतका म्हणजेच शून्य टक्के तुटीचा पाऊस झाल्याने देशाच्या सरासरीला मोठा आधार मिळाला आहे. अतिवृष्टीचे विक्रम नोंदवणाऱ्या मेघालयात तब्बल ५७ टक्के तुटीची नोंद झाली आहे.
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. जूनमध्ये देशात ८० टक्के कमी पाऊस झाला होता, तर जुलैमध्ये २४ कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशात चांगला पाऊस झाला. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही देशात सरासरीपेक्षा ९० ते ९४ टक्के म्हणजेच कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:24 10-08-2026














