रत्नागिरी जिल्ह्यातील ६४,१२५ ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त मोफत उपचारांचा लाभ
Ayushman Bharat News: जिल्ह्यातील ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत ‘आयुष्मान वय वंदना’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र ६४ हजार १२५ ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त मोफत उपचार (टॉप-अप) उपलब्ध होणार आहेत. तरी पात्र लाभार्थ्यांनी आपले कार्ड त्वरित काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. मात्र, ज्या कुटुंबांकडे आधीपासूनच आयुष्मान कार्ड उपलब्ध आहे, त्या कुटुंबातील ७० वर्षे व त्यांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेअंतर्गत स्वतंत्र ५ लाख रुपयांचे अतिरिक्त आरोग्य संरक्षण (टॉप-अप) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.
जिल्ह्यात ६ ऑगस्टपर्यंत २६ हजार ६४३ ज्येष्ठ नागरिकांनी आपले ‘आयुष्मान वय वंदना’ कार्ड तयार करून घेतले आहे. उर्वरित पात्र नागरिकांनीही उशीर न करता हे कार्ड लवकरात लवकर तयार करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
हे कार्ड काढण्यासाठी पात्र ज्येष्ठ नागरिक अंगीकृत रुग्णालयातील ‘आरोग्य मित्र’, गावातील आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र (CSC), तसेच स्थानिक राशन दुकानदारांची मदत घेऊ शकतात. याशिवाय स्वयं नोंदणीसाठी beneficiaries.nha.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा ‘Ayushman Mobile App’ वरून मोफत कार्ड तयार करता येईल, असे डॉ. आठल्ये यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:04 10-08-2026














