मृत टीएमसी कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटायला जाताना बिजापूरजवळ घडला प्रकार; ‘माझ्या हत्येचा कट’ असल्याचा गंभीर आरोप
Mamata Banerjee Convoy Attack News: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बिजापूर (हलीसहर) येथे स्थानिक संतप्त जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हलीसहर पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेले टीएमसी कार्यकर्ते बिरजू केओ यांच्या शोकाकूल कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.
घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी हा आपल्या हत्येचा आणि सुरक्षेतील गंभीर चुकीचा कट असल्याचा घणाघाती आरोप केला. “माझ्या येण्याची पूर्वकल्पना देऊनही पोलिसांनी कोणतीही चोख सुरक्षा व्यवस्था केली नाही. गाडीच्या खिडक्या उघड्या असत्या तर माझ्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवही गेला असता,” असे ताशेरे ओढत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, टीएमसी कार्यकर्ते बिरजू केओट यांचा हलीसहर पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बिरजू यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ममता बॅनर्जी हलीसहरकडे जात असताना बिजापूर येथे स्थानिक जमावाने त्यांचा ताफा अडवला. जमावाने ‘चोर, चोर’ आणि ‘दरोडेखोर राणी’ अशा घोषणा देत त्यांच्या वाहनावर चिखल, गाळ, पाण्याच्या बाटल्या, चपला आणि दगडफेक केली. पोलिसांनी तातडीने कडे करून ममता बॅनर्जी यांची गाडी सुरक्षितपणे बाहेर काढली.
दुसरीकडे, विरोधक आणि भाजप नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना या हल्ल्याचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, हा सर्व प्रकार ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा निर्माण झालेला थेट संताप असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी दगडफेक व चपला फेकण्याच्या घटनेचा निषेध करत, हा प्रकार भाजपच्या संस्कृतीत बसणारा नसल्याचे सांगत आरोपांचे खंडन केले आहे.
मे २०२६ मधील सत्तांतरानंतरही ममता बॅनर्जी यांची ‘Z+’ सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले असून पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 10-08-2026














