८० व्या स्वातंत्र्यदिनी सलग १३ व्यांदा संबोधित; गेल्या १२ वर्षांतील आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत प्रगतीचा मांडला लेखाजोखा
PM Modi Independence Day Speech अंतर्गत भारताने आज एक मोठे स्वप्न पाहिले असून, स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा २०४७ सालापर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे ध्येय १४० कोटी जनतेच्या पुरुषार्थाने नक्की साध्य करू, असा ठाम निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून सलग तेराव्यांदा देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते. यंदाच्या सोहळ्यात पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर गुंजलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत विशेष आकर्षण ठरले.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी गेल्या १२ वर्षांतील देशाच्या आर्थिक आणि सामाजिक बदलांचा सविस्तर आढावा घेतला. पूर्वी ‘फ्रेजाईल ५’ (Fragile 5) अर्थव्यवस्थांमध्ये गणला जाणारा भारत आज जगातील पहिल्या ५ प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झाला आहे. गेल्या १२ वर्षांत कोट्यवधी नागरिकांच्या समर्पणामुळे २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. तसेच, देशाच्या विविध भागांत आलेल्या पूर आणि भूस्खलनाच्या संकटातील बाधितांच्या पाठीशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
PM Modi Independence Day Speech: पायाभूत सुविधा अन् उत्पादनात अभूतपूर्व वाढ; ‘आत्मनिर्भर भारत’वर भर
देशातील विकासकामांच्या वेगावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत संरक्षण क्षेत्रातील उत्पादन चार पटीने, खादी-ग्रामोद्योग उत्पादन पाच पटीने, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सात पटीने आणि मोबाईल उत्पादन ३३ टक्क्यांनी वाढले आहे. याशिवाय इंटरनेट ग्राहक ४ पटीने वाढले असून पेटंट्सची संख्या चार पटीने आणि डिजिटल व्यवहार १०० टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच, दरवर्षी १५ पट वेगाने नळ जोडण्या, ६ पट वेगाने गॅस कनेक्शन्स, ४ पट वेगाने शौचालये आणि ३ पट वेगाने गरिबांना घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
प्रशासकीय सुधारणांचा उल्लेख करताना त्यांनी शेकडो जुने व कालबाह्य कायदे रद्द केल्याचे सांगितले. “दुसऱ्या देशांवर अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतेवर उभे राहणे हीच काळाची गरज आहे. लहान स्वप्ने न बघता मोठी स्वप्ने आणि दृढ संकल्प ठेवूनच आपण २०४७ मधील विकसित भारताचे ध्येय पूर्ण करू शकतो,” असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा पुनरुच्चार केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 15-08-2026














