- युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे आवाहन; बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने
Ratnagiri Bank Employees Protest News अंतर्गत बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी पाच दिवसांचा बँकिंग आठवडा तातडीने लागू करावा, या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आवाहनानुसार रत्नागिरीत जोरदार निदर्शने करण्यात आली.
रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडले. यामध्ये जिल्ह्यातील विविध बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान “आम्हाला पाच दिवसांचे बँकिंग मिळालेच पाहिजे”, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या, ज्यामुळे परिसर दणाणून गेला होता.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), विमा क्षेत्र (LIC/GIC) तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये आधीपासूनच पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. मग केवळ बँक कर्मचाऱ्यांवरच सहा दिवस कामकाजाचा अतिरिक्त भार का लादला जात आहे, असा संतप्त सवाल या वेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
Ratnagiri Bank Employees Protest News: डिजिटल बँकिंगमुळे सेवा चोवीस तास उपलब्ध; मागणी मान्य करण्याची विनंती
डिजिटल युगात संगणकीय बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेटद्वारे बहुतांश बँकिंग सेवा आता ग्राहकांसाठी २४ तास उपलब्ध आहेत. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा ही केवळ सुट्टीची मागणी नसून कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, काम आणि वैयक्तिक आयुष्याचा (Work-Life Balance) समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे अधिक कार्यक्षम ग्राहकसेवा देण्यास मदत होईल, अशी भूमिका बँक संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडली.
जर ही मागणी तातडीने मान्य केली नाही, तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. या यशस्वी निदर्शनांचे आयोजन किरण खोपडे, मनोज लिंगायत आणि रोहित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 15-08-2026














