विठूनामाच्या गजराने राजापूर शहर दुमदुमले..!

श्रावणी पुत्रदा एकादशीनिमित्त वारकरी दिंडी; पारंपरिक वेषातील वारकऱ्यांनी वेधले लक्ष

राजापूर :

श्रावणातील पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील वारकरी मंडळांच्या वतीने रविवारी श्री भक्त पुंडलिक मंदिर ते बाजारपेठेतील ऐतिहासिक श्री विठ्ठल पंचायतन मंदिर अशी भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर, विठूनामाचा जयघोष आणि पारंपरिक वेषातील वारकऱ्यांमुळे राजापूर शहर व बाजारपेठ भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.

गेल्या काही वर्षांत कोकणातून पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. राजापूर तालुका व शहर परिसरातील अनेक वारकरी कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावरील श्री पुंडलिक मंदिरापासून श्री विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्याची परंपरा आहे. मात्र आषाढी एकादशीच्या कालावधीत शेतीची कामे सुरू असल्याने कोकणातील अनेक वारकऱ्यांना पंढरपूरला जाने शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर राजापूर बाजारपेठेतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर हे ‘प्रति पंढरपूर’ मानून श्रावणातील एकादशीला स्थानिक पातळीवर वारी काढण्याचा संकल्प वारकरी मंडळांनी केला आहे. यावर्षी सलग तिसऱ्या वर्षी पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने ही दिंडी काढण्यात आली.

सकाळी सर्व वारकरी श्री भक्त पुंडलिक मंदिर येथे एकत्र जमले. अर्जुना नदीमध्ये स्नान करून श्री भक्त पुंडलिकाची पूजा करण्यात आली. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडीला सुरुवात झाली. विठ्ठल मंदिर, बंदरधक्का, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, जवाहरचौक मार्गे दिंडी बाजारपेठेत दाखल झाली. संपूर्ण मार्गावर विठ्ठलनामाचा जयघोष आणि अभंग-भजनामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

जवाहरचौक येथे वारकऱ्यांनी रिंगण धरून भावभक्तीचा अनोखा आविष्कार सादर केला. यावेळी उपस्थित नागरिक व भाविकांनीही या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेतला. बाजारपेठेतील इतिहासकालीन श्री विठ्ठल पंचायतन मंदिरात दिंडीची सांगता झाली. यावेळी भजन, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय कार्यक्रम पार पडला.

यावेळी वारकरी संप्रदायाचे प्रमुख ह. भ. प. दादा राजापूरकर, विठ्ठल चोरगे, अंकुश पावसकर, राजापूर तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर, भक्तवत्सल भक्तिभाव मंडळाचे संदीप मालपेकर, विवेक गादीकर, चंद्रशेखर मोंडे यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 26-08-2026