गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात डंका; ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत द्वितीय पुरस्काराने सन्मानित

गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात डंका; 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत द्वितीय पुरस्काराने सन्मानित
नाशिक येथील दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव; सरपंच मंगेश सोलकर व पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पुरस्कार

गुहागर / नाशिक : गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७’ अंतर्गत महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून खामशेत गावाला राज्यात द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. नाशिक येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ऐतिहासिक यशाने संपूर्ण गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
​मंत्रिमंडळातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती :
या शानदार पुरस्कार सोहळ्यास व्यासपीठावर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते खामशेत गावचे लोकनियुक्त सरपंच मंगेश सोलकर, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी हा पुरस्कार अत्यंत अभिमानाने स्वीकारला.

​प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती :

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती वैदेही रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गुहागरचे गटविकास अधिकारी (BDO) प्रदीप शिंदे, खामशेतचे प्रशासक चंद्रकांत कारंडे, ग्रामसेवक श्री. मोहिरे यांच्यासह साईनाथ बागुल, कृष्णदेव कदम उपस्थित होते. तसेच साखरी त्रिशूलचे सरपंच सचिन मस्कर, झोपावेचे सरपंच आशीर्वाद पावसकर, खोडदेचे सरपंच प्रतीक पवार आणि पंचायत समिती व ग्रामपंचायतीमधील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​ग्रामीण विकासाचे आदर्श मॉडेल ठरले खामशेत :

शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी, पारदर्शक कारभार, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांत खामशेत ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकाराची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. गावाला मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे सर्वच स्तरातून सरपंच मंगेश सोलकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Aayurzil