रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील कामांचा आढावा; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचेही दिले आश्वासन
*रत्नागिरी : * रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली नळपाणी पुरवठा योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा ठेकेदारांना भविष्यात थेट काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात येईल, असा सक्त इशारा उद्योग व पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
*पाणीपुरवठा व महावितरणने समन्वय ठेवावा; कामात अडथळा आणल्यास पोलिसांत तक्रार करा :*
बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. सामंत म्हणाले की, भविष्यातील संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन जलजीवन मिशनची सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. यासाठी महावितरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आपापसात योग्य समन्वय ठेवावा. तसेच पाणी योजनेची कामे करताना जर स्थानिक नागरिक अथवा कोणीही इतर व्यक्ती विनाकारण अडथळा निर्माण करत असेल, तर त्यांच्याविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या बैठकीस कार्यकारी अभियंता अमोल दाभोळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आणि मतदारसंघातील ठेकेदार उपस्थित होते.

*शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील समस्या जाणून घेतल्या; सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही :*
या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री डॉ. सामंत यांनी शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. यावेळी प्राध्यापक व स्टाफची कमतरता, व्यावसायिक प्रशिक्षणाचा अभाव आणि प्रयोगशाळांमध्ये (लॅब) पुरेशी उपकरणे नसणे यांसारख्या गंभीर समस्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांपुढे मांडल्या. या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. तसेच महाविद्यालयात ‘टेक्निकल फेस्टिव्हल’ आणि ‘ऑटो एक्स्पो’सारखी भव्य प्रदर्शने भरवण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी शासकीय सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य सुधीर अकोजवार आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
*मच्छिमारांना कृषी दरानेच वीजपुरवठा करा; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश :*
शासनाच्या ९ मे २०२५ च्या निर्णयानुसार मत्स्यव्यवसाय क्षेत्राला शेतीप्रमाणे पायाभूत सुविधा व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत मच्छिमार व मत्स्यकास्तकारांना कृषी दराने वीज देण्याची तरतूद आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून महावितरणकडे पाठवण्यात आलेल्या ५६ प्रस्तावांपैकी २२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर प्रस्तावांनुसार तात्काळ कृषी दराने वीजपुरवठा सुरू करावा, अशा सूचना डॉ. सामंत यांनी दिल्या. या बैठकीला सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय जीवन सावंत, नगरसेवक बंड्या साळवी, माजी नगरसेवक सुदेश मयेकर आणि ॲड. समृद्धी मयेकर उपस्थित होते.













