Ratnagiri: भाटये येथे दारूच्या नशेत पतीचा पत्नीवर दगडानं प्राणघातक हल्ला!

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रत्नागिरी:

दारूच्या नशेत झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने आपल्याच पत्नीवर दगडानं प्राणघातक हल्ला केल्याची एक धक्कादायक घटना रत्नागिरी शहरालगत असलेल्या भाटये महाजनवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी पतीविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास भाटये महाजनवाडी येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरी घडला. या घटनेनंतर २४ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३७ वाजता शहर पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपी कैलास सुधीर भाटकर हा दारू पिऊन आणि नॉनव्हेज चायनीज डिशचे पार्सल घेऊन पत्नीच्या घरी आला होता. त्या वेळी त्याची पत्नी गौरी कैलास भाटकर (वय ४१, रा. भाटये महाजनवाडी) यांनी त्याला, “तू घरी का आलास? तुला आज बायको व मुलग्याची आठवण कशी काय आली? तू रुचीसोबत राहा,” असे विचारले. या किरकोळ कारणावरून संतापलेल्या आरोपीने पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आपल्या वडिलांना आईशी अशा प्रकारे भांडताना पाहून त्यांचा अल्पवयीन मुलगा आराध्य हा मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला. त्याने “बाबा, माझ्या आईला शिव्या देऊ नका,” अशी विनंती केली. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या आरोपीला याचा अधिकच राग आला आणि त्याने मुलाचा हात पकडून त्याला घराबाहेर रस्त्यावर ओढून नेले. मुलाला ओढून नेताना पाहून फिर्यादी गौरी यांनी, “मुलाला हात लावायचा नाही, भांडण आपल्या दोघांचे आहे,” असे म्हणत मुलाला पतीच्या तावडीतून सोडवून सुरक्षितपणे आपल्याजवळ घेतले.

याचा राग अनावर झाल्याने आरोपी कैलास भाटकर याने रस्त्यावरील मोठा दगड उचलून थेट पत्नीच्या डोक्यात घातला. या प्राणघातक हल्ल्यात गौरी भाटकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

याप्रकरणी जखमी गृहिणी गौरी भाटकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी कैलास सुधीर भाटकर याच्याविरुद्ध ‘भारतीय न्याय संहितेच्या’ (BNS) कलम ११७(१), ३५२ तसेच ‘भारतीय दंड संहितेच्या’ (IPC) कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 26-08-2026