लोटे एमआयडीसी परिसरातील कॉर्टेवा कंपनीसमोरील घटना
खेड (रत्नागिरी):
मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसी परिसरात असलेल्या कॉर्टेवा कंपनीसमोर एका भरधाव महिंद्रा थार गाडीने धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत अंदाजे ४५ वर्षांची एक महिला गंभीर जखमी झाली असून, याप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:१० वाजेच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ७:३४ वाजता खेड पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी चालक आरीफ इसाक साठविलकर (वय ३७, रा. परळेमाण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हा आपली महिंद्रा थार रॉक्स गाडी (क्रमांक MH09/GU/7275) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून खेडकडून चिपळूणच्या दिशेने वेगाने जात होता. लोटे एमआयडीसी परिसरातील कॉर्टेवा कंपनीसमोर आला असता, त्याने गाडीवरील नियंत्रण गमावून अत्यंत हयगयीने वाहन चालवले.
त्याच वेळी महामार्गावरील रस्ता दुभाजकाजवळून खेडच्या दिशेने पायी चाललेल्या अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी महिलेला या भरधाव थार गाडीने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे सदर महिला रस्त्यावर फेकली जाऊन गंभीर जखमी झाली. तसेच या अपघातात थार गाडीचेही किरकोळ नुकसान झाले आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजित संतोष कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी चालक आरीफ इसाक साठविलकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या (MVA) कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघातात जखमी झालेल्या अनोळखी महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 26-08-2026














