रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भाग व महाविद्यालयीन परिसरात ड्रग पेडलर्सचा वावर; विशेष पथके तैनात करण्याची मागणी
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मनसेचे रत्नागिरी उप जिल्हा अध्यक्ष श्री. रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून, जिल्ह्यातील अंमली पदार्थ पुरवठादारांची साखळी समूळ नष्ट करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
रत्नागिरीत अंमली पदार्थांची सहज उपलब्धता; युवा पिढी धोक्यात
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रामुख्याने शहरी भागातील तरुणाई दिवसेंदिवस व्यसनाधीनतेकडे वळत असल्याबद्दल मनसेने चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्यात कोकेन, अफू, चरस आणि गांजा यांसारखे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने देशाचे भवितव्य असलेली युवा पिढी, विशेषतः ‘Gen-Z’ तरुणाई या जाळ्यात अडकत चालली आहे. रत्नागिरी शहरातील शाळा, महाविद्यालयांचा परिसर आणि निर्जन स्थळांवर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या हस्तकांचा (ड्रग पेडलर्स) वावर वाढला आहे. या प्रकाराला तात्काळ आळा घालण्यासाठी अशा संवेदनशील ठिकाणी पोलिस प्रशासनाने विशेष पथके तैनात करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
केवळ लहान हस्तकांवर नव्हे, तर मुख्य ड्रग्स माफियांच्या मुसक्या आवळण्याची गरज
अंमली पदार्थांचे व्यसन लागलेले तरुण नंतर या अवैध विक्रीच्या साखळीचा भाग बनतात आणि त्यातून गंभीर गुन्हेगारी कृत्ये घडतात, असे अनेक दाखले आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी केवळ व्यसनाधीन तरुणांवर किंवा लहान-मोठ्या हस्तकांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, असे मनसेने स्पष्ट केले. या काळ्या धंद्याचे मुख्य सूत्रधार असणाऱ्या ड्रग्स माफियांचे जाळे तोडून त्यांच्या मुळावर घाव घालणे गरजेचे आहे.
जनजागृती आणि कारवाईसाठी मनसेचे पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य
कर्तव्यदक्ष पोलिस प्रशासनाकडून या समस्येचे समूळ उच्चाटन व्हावे, अशी अपेक्षा रत्नागिरीतील जनतेला आहे. या समस्येविरोधात लढा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलिस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असून, सहकार्याने जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देताना मनसे उप जिल्हा अध्यक्ष रुपेश जाधव, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, तेजस नागवेकर, मार्विक नारकर, मनोज इंदुलकर आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 27-08-2026














