Anuskura Ghat Traffic Jam: अणुस्कुरा घाटात १४ चाकी ट्रक बंद पडल्याने वाहतूक ठप्प; अवजड वाहनांची कोंडी

तांत्रिक बिघाडामुळे राजापूर-कोल्हापूर महामार्गावर गोंधळ

रत्नागिरी

राजापूर-कोल्हापूर महामार्गावरील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या अणुस्कुरा घाटात मंगळवारी रात्री कोल्हापूरच्या दिशेने जाणारा एक १४ चाकी ट्रक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली.

रात्रीच्या अंधारात पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पथक आणि अणुस्कुरा चेकपोस्टवरील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून दुचाकी तसेच अल्टो, वॅगनार यांसारख्या लहान चारचाकी वाहनांसाठी एकेरी वाहतूक मोकळी करून दिली. मात्र, रस्ता अरुंद असल्याने मोठ्या वाहनांना तेथून मार्ग काढणे अशक्य बनले. परिणामी, राजापूर आगाराच्या एसटी बससह अनेक मोठी वाहने घाटातच अडकून पडली होती. बंद पडलेला ट्रक हटवून मार्ग सुकर करण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु रात्रीच्या अंधारामुळे या कामात मोठे अडथळे येत होते.

आंबा घाट बंदीमुळे अणुस्कुरा घाटावर अवजड वाहनांचा ताण

गेल्या काही दिवसांपासून आंबा घाट अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात अणुस्कुरा घाटातून वळवण्यात आली आहे. या अचानक वाढलेल्या वाहतुकीमुळे ओणी-अणुस्कुरा मार्गावर प्रचंड ताण आला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे आधीच बिकट झालेल्या या मार्गावर अशा प्रकारे वाहने बंद पडत असल्याने वाहनचालकांना व प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 27-08-2026