अमृतनगर परिसरातील घटना; ओलसर दांडक्याने मारहाण करत दिल्या जीवे मारण्याच्या धमक्या
देवरुख (संगमेश्वर/रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील अमृतनगर परिसरात सामाईक जागेच्या जुन्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या ७१ वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करत ओलसर कुजलेल्या दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात विजय धोंडू चाळके हे वृद्ध जखमी झाले असून, त्यांना गंभीर दुखापत करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांचे सख्खे भाऊ मिलिंद धोंडू चाळके यांच्याविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ
देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ ते २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० या वेळेत ‘आनंदी कुंज’, अमृतनगर येथे ही घटना घडली. पीडित विजय चाळके आपल्या घरी आले असता, आरोपी भाऊ मिलिंद चाळके याने सामाईक जागेच्या वादावरून त्यांच्याशी वाद घालून अश्लील शिवीगाळ केली. आरोपीने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विजय यांची पत्नी मध्यस्थीसाठी घराबाहेर आली आणि त्यांनी मोबाईलवर या घटनेचे चित्रीकरण (शूटिंग) सुरू केले.
याचा राग आल्याने आरोपी मिलिंदने जमिनीवर पडलेला ओलसर व कुजलेला दांडका उचलून थेट विजय यांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने विजय यांना वेळेत बाजूला ओढल्याने हा वार डोक्याऐवजी त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर बसला.
हात-पाय तोडून गाडून टाकण्याची धमकी; देवरुख पोलिसांत गुन्हा
हल्ल्यानंतरही आरोपीने शिवीगाळ सुरूच ठेवत, दोघांचे हात-पाय तोडून टाकण्याची आणि तेथेच गाडून टाकण्याची धमकी दिली. तसेच पोलिस व वकिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करत दमदाटी केली. २५ ऑगस्ट रोजी सकाळी आरोपीने पुन्हा शिवीगाळ व धमकी दिल्याने अखेर विजय चाळके यांनी देवरुख पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या फिर्यादीवरून देवरुख पोलिसांनी आरोपी मिलिंद चाळके याच्याविरोधात गुन्हा क्रमांक १२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास देवरुख पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 27-08-2026














