नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची सकारात्मक बैठक; मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांची उपस्थिती
रत्नागिरी :
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या डिझेल दराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील मच्छीमार प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील यांत्रिक मासेमारी नौका आणि मच्छीमार सहकारी संस्थांना प्रचलित किरकोळ दराने (रिटेल रेट) डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आली.
इंधनखर्च वाढल्याने सागरी मत्स्यव्यवसाय अडचणीत
या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यासह मच्छीमार संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे मासेमारीचा उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, समुद्रात जाणाऱ्या मासेमारीच्या फेऱ्या आर्थिकदृष्ट्या तोट्याच्या ठरत असल्याचे प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. इंधनखर्च, नौकांची देखभाल, जाळ्यांची दुरुस्ती आणि कामगारांचे मानधन यामुळे एकूण खर्च वाढल्याने किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसायावर आणि मच्छीमारांच्या दैनंदिन उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून पाठपुरावा
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यांत्रिक मासेमारी क्षेत्राला दिलासा देण्यासाठी डिझेल दरात योग्य ती सवलत द्यावी, अशी आग्रही भूमिका खासदार नारायण राणे यांनी मांडली. या चर्चेला केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्राच्या पातळीवर यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त समन्वयातून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील काळात अधिक प्रभावी पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. डिझेल दरात सवलत मिळाल्यास उत्पादनखर्च कमी होऊन सागरी मत्स्यव्यवसायाला मोठी चालना मिळेल आणि किनारपट्टीवरील अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल.
या महत्त्वपूर्ण बैठकीस महाराष्ट्र राज्य मच्छीमार संस्था संघाच्या अध्यक्ष ज्योती राजेश मेहेर, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मेघनाद गणपत धुरी, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष हरेश्वर हरिश्चंद्र कालेकर, देवगडचे ज्ञानेश्वर सूर्यकांत खवळे व सचिन दत्ताराम कदम, मुंबई जिल्हा अध्यक्ष रामदास पांडुरंग संघ, रायगड जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद दिनेश पाटील आणि निवृत्ती रविंद्र तारी यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 27-08-2026














