Chiplun Housebreak Case Solved: मार्गताम्हाणे घरफोडी प्रकरणाचा अवघ्या २ तासांत उलगडा; चिपळूण पोलिसांकडून ४.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलिसांची धडक कारवाई

चिपळूण (रत्नागिरी)

चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे बंद घर फोडून चोरी करणाऱ्या आरोपीचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या अत्यंत गतिमान आणि कार्यक्षम कारवाईमुळे चोरीस गेलेला तब्बल ४ लाख ४५ हजार ८४२ रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास

मार्गताम्हाणे येथील गोपाळवाडी परिसरात अज्ञात भामट्याने बंद घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. घरफोडीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तैनात करण्यात आले.

चिपळूण पोलिसांच्या पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीचा सुगावा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ४,४५,८४२ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

चिपळूण पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

ही धडक कारवाई चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने केली. घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या दोन तासांच्या विक्रमी वेळेत छडा लावून मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे चिपळूण पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण तालुक्यातून आणि नागरिकांमधून मोठे कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 27-08-2026