Ratnagiri MIDC D Plus Grade: रत्नागिरी एमआयडीसीचा ‘ड प्लस’ वर्गात समावेश; उद्योगांना मिळणार विशेष सवलती

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्याला यश; जिल्ह्यात भांडवली गुंतवणूक आणि रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होणार

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. रत्नागिरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) दर्जा ‘क’ वर्गावरून थेट ‘ड प्लस’ (D+) वर्गात श्रेणीवर्धित करण्यात आला आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून या निर्णयाची अधिकृत माहिती देण्यात आली असून, या निर्णयामुळे स्थानिक तसेच नव्या उद्योजकांसाठी औद्योगिक विकासाची आणि भांडवली गुंतवणुकीची नवी कवाडे उघडली आहेत.

गडचिरोलीच्या धर्तीवर सवलती आणि रेड कार्पेट

एमआयडीसीचा वर्ग बदलल्यामुळे आता गडचिरोलीसारख्या विशेष औद्योगिक क्षेत्रांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती, अनुदाने आणि सोयी-सुविधा रत्नागिरीतील उद्योजकांना सहज उपलब्ध होणार आहेत. ‘ड प्लस’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे:

  • सुलभ बँक कर्ज: जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकांच्या माध्यमातून विविध शासकीय प्रोत्साहन योजनांतर्गत सुलभतेने कर्जपुरवठा उपलब्ध होईल.
  • उद्योजकांना रेड कार्पेट: नवीन उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगाने व सुटसुटीत होतील.
  • अनुदान आणि कर सवलती: विशेष वर्गवारीमुळे उद्योगांना वीज, जमीन आणि भांडवली गुंतवणुकीवर विशेष सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रोजगाराच्या हजारो नव्या संधी

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष पुढाकारातून रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही काळात अनेक नवे प्रकल्प प्रत्यक्षात येत आहेत. लोटे-परशुराम औद्योगिक परिसरासह जिल्ह्यातील इतर एमआयडीसी क्षेत्रांमध्ये नवनवीन उद्योगांची भर पडत आहे. एमआयडीसीच्या ‘ड प्लस’ वर्गवारीमुळे कोकणातील स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 27-08-2026