गणेशोत्सवाच्या तोंडावर धोका वाढला; पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी
चिपळूण :
Kalkavane Bridge Pothole मुळे चिपळूण तालुक्यातील कळकवणे-आकले-तिवरे मार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुलावर मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने सन २०२२ मध्ये सुमारे अडीच कोटी रुपये खर्चास मंजुरी दिल्यानंतर बांधण्यात आलेल्या या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सायंकाळच्या सुमारास खड्डा निदर्शनास; ग्रामस्थांची सतर्कता
हा पूल ठेकेदार एस. एम. चिपळूणकर यांनी बांधल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. सायंकाळच्या सुमारास पुलावर मोठा खड्डा पडल्याचे अचानक निदर्शनास आले. यानंतर कळकवणे येथील एम. डी. शिंदे, विकास शिंदे, महेंद्र शिंदे, प्रवीण शिंदे, कदम, बापू गमरे आदी ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. खड्डा दिसताच ग्रामस्थांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना खबरदारीचा इशारा देत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
गणेशोत्सवात वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका
आगामी काही दिवसांत गणरायाचे आगमन होणार असून गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येणार आहेत. या काळात कळकवणे-आकले-तिवरे मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा गर्दीच्या परिस्थितीत पुलावरील हा खड्डा वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी
पुलाच्या बांधकामाला अवघी काहीच वर्षे उलटली असताना अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलावरील खड्डा तत्काळ दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी कळकवणे ग्रामस्थांनी केली आहे. यासोबतच पुलाच्या निकृष्ट बांधकामाच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करण्याची मागणीही जोर धरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 29-08-2026














