केंद्र सरकारच्या कडक नियमांमुळे घाऊक साखरेचे दर ५,५०० रुपयांवर
पुणे :
Sugar Price Reduction च्या केंद्र सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे घाऊक बाजारात एस ३० ग्रेड साखरेचे प्रतिक्विंटलचे दर ५०० ते ७०० रुपयांनी घटून ५,५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. केंद्र सरकारने कारखान्यांकडील साखर खरेदीसाठी व्यापाऱ्यांना पोर्टलवर नोंदणी बंधनकारक केली आहे. तसेच नोंदणीधारक व्यापाऱ्यांनाच साखर विक्रीचे बंधन घालत उत्पादक आणि विक्रेत्यांना चाप लावला आहे. घाऊक बाजारात दर कमी झाले असले, तरी किरकोळ बाजारात मात्र साखर अद्याप प्रतिकिलो ६१ ते ६२ रुपये या चढ्या दरानेच विकली जात असल्याने ग्राहकांना बसणारी आर्थिक झळ तूर्तास कायम आहे.
सट्टेबाजांनी काढला पाय; निविदांचे दर ५,००० रुपयांवर
देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून कारवाईचा ससेमिरा आणि विविध बंधनांचा दबाव टाकण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरले आहे. त्यामुळे साखरेच्या निविदांमधून सट्टेबाजांनी तत्काळ पाय काढल्याचे स्पष्ट झाले आहे. सट्टेबाज निविदा प्रक्रियेतून गायब झाल्यामुळे साखर निविदांचे दरही ५०० रुपयांनी घसरून प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांवर स्थिरावले आहेत.
दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे कडक धोरण
साखरेच्या वाढत्या दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने अनेक नियम लागू केले आहेत. यात साखर व्यापाऱ्यांना पोर्टलवर साखरेच्या साठ्याची स्थिती जाहीर करणे व ती अद्ययावत करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे पूर्वी ७,००० ते ७,२०० रुपये क्विंटलवर पोहोचलेले एस ३० ग्रेड साखरेचे दर दिवसागणिक कमी झाले आहेत. तसेच सर्व डीलर्सना डीएफपीडीच्या (DFPD) पोर्टलवर नोंदणी करून दर शुक्रवारी साठ्याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दर उतरण्याची प्रमुख कारणे
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर २०२६ पासून मासिक कोटा ऐवजी १५ दिवसांचा कोटा जाहीर केला आहे. यानुसार कारखान्यांना पहिल्या आठवड्यात किमान ४० टक्के साठा विकणे बंधनकारक आहे. याशिवाय साखर कारखान्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांकडे असलेल्या प्रत्यक्ष साठ्याची तपासणी करण्यासाठी राज्यभरात छापा सत्र राबवण्यात आले. तसेच घाऊक व्यापारी आणि मोठ्या ग्राहकांसाठी साखरेच्या साठ्यावर कडक मर्यादा घालण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 29-08-2026














