Sonavde Phata Vashi Road: सोनवडे फाटा-वाशी रस्ता ‘जैसे थे’! प्रशासनाच्या आश्वासनानंतरही कामाला सुरुवात नाही

१५ दिवस उलटूनही कंत्राटदाराकडून दुर्लक्ष


देवरूख :
Sonavde Phata Vashi Road च्या दुरवस्थेबाबत गेल्या दोन महिन्यांत दोनवेळा कार्यकारी अभियंता, देवरूख यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, आजवर रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून तोंडी आणि लेखी आश्वासने देऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.

आंदोलन स्थगितीचे पत्र, तरीही कामात दिरंगाई
या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात मुचरी युवा सामाजिक संस्थेने १५ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर संबंधित अभियंत्यांनी १३ ऑगस्ट रोजी संस्थेला लेखी पत्र पाठवून रस्त्यावर आलेली झाडे आणि दगड दूर करण्याचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण केले जाईल, असे ठोस आश्वासन दिले होते. या पत्राच्या आधारे १५ ऑगस्टचे आंदोलन स्थगित करण्याची विनंती प्रशासनाने केली होती. मात्र, या पत्राला आज १५ दिवस उलटून गेले तरी प्रत्यक्ष कामात कोणतीही प्रगती दिसून आलेली नाही.

कंत्राटदाराच्या कारभारावर आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह
कंत्राटदार ‘कोंडवाडी प्रकल्प धरणग्रस्त मजूर सहकारी संस्था’ यांच्याकडून प्रत्यक्ष कामाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. “एखादा मोठा अपघात किंवा मनुष्यहानी झाल्यानंतरच संबंधित प्रशासनाचे डोळे उघडणार का?” असा संप्तत सवाल आता नागरिक विचारत आहेत. कामात सातत्याने दिरंगाई करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर अद्याप कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनास जबाबदार धरण्याचा इशारा
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा मुचरी युवा सामाजिक संस्थेने दिला आहे. आता केवळ पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला तात्काळ सुरुवात करून हा रस्ता नागरिकांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 29-08-2026