SEBC Reservation टिकवण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी; मराठा क्रांती मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे निर्णायक आंदोलन सुरू होत असतानाच, दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून SEBC Reservation टिकविण्याची आग्रही मागणी केली आहे. अंतरवली सराटीतील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंदोलन रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठा समाजाने मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या आरक्षणावर शासनाची काय तयारी आहे, याची संक्षिप्त माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे.
पुणे येथील सारथी कार्यालयात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण अभ्यासकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत केवळ नोंदी असलेल्या कुणबी बांधवांच्या आरक्षणाव्यतिरिक्त, ज्यांची नोंद फक्त ‘मराठा’ अशी आहे, अशा कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यभरातील उर्वरित मोठ्या वर्गाच्या SEBC आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. हे आरक्षण सध्या न्यायालयात प्रलंबित असल्याने ते टिकवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ठोस कायदेशीर भूमिका घ्यावी, यावर बैठकीत एकमत झाले.
या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत अपेक्षित कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संपूर्ण प्रक्रियेच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून समितीच्या जबाबदारीतून बाजूला व्हावे, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली आहे.
यासोबतच, बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या प्रश्नावरही गंभीर चर्चा झाली. महामंडळाच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित व्याज शासनाने तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावे, अन्यथा वेळेत व्याज न भरल्याने या उद्योजक तरुणांचे CIBIL स्कोर खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शासनाने यावर तातडीने मार्ग काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सारथी कार्यालयातील या महत्त्वपूर्ण बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये राजेंद्र कोंढरे, विजय घोगरे, राजेंद्र कुंजीर, अनिल ताडगे, धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे पाटील, सचिन आडेकर, व्यंकटेश बोडखे, अमर पवार, राकेश गायकवाड, किशोर मोरे, प्रशांत कुंजीर, मारुती भापकर, अभिमन्यू पवार, दशहरी चव्हाण, प्रकाश जाधव आणि टिळक भोस यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 29-08-2026














