छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचातुर्य दिनानिमित्त ‘गरुडझेप’तर्फे आयोजन; चार राज्यांतून प्रवास करत महाराष्ट्राचे सायकलपटू राजगडावर दाखल
Agra to Rajgad Cycle Expedition अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सात सायकलपटूंनी १४०० किलोमीटरहून अधिक अंतराची ऐतिहासिक सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कैदेतून आपल्या बुद्धिचातुर्याने केलेल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या ‘शिवचातुर्य दिना’चे औचित्य साधून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याच्या गरुडझेप संस्थेतर्फे १७ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही आग्रा ते राजगड सायकल मोहीम पार पडली.
Agra to Rajgad Cycle Expedition: रत्नागिरी जिल्ह्यातील सायकलपटूंचा सहभाग
या खडतर आणि ऐतिहासिक मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे सुनील शिंदे (वय ५६) यांच्यासह चिपळूण सायकलिंग क्लबचे प्रशांत दाभोळकर, हेमंत भोसले, ज्योती परांजपे, डॉ. अश्विनी गणपत्ये, रमा करमरकर आणि अमित कवितके (रत्नागिरी) या सात सायकलपटूंनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
चार राज्यांतून १४०० किमीचा प्रवास
गरुडझेप मोहिमेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आबा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिरीष लोणकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून एकूण ५० सायकलपटू या मोहिमेत सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांतून जात आग्रा, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, पाचोर, देवास, ठिकरी, नरडाणा, चांदवड, संगमनेर, पुणे मार्गे ही मोहीम राजगडावर पोहोचली. सायकलपटूंसोबत शिवज्योत घेऊन धावणारे शिवभक्त आणि मर्दानी खेळ सादर करणारे वीरही या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरले. आग्रा येथील कडक ऊन, रस्त्यावरील चढउतार आणि पावसाचा सामना करत सायकलपटूंनी हा प्रवास पूर्ण केला.
सुनील शिंदे यांनी व्यक्त केला अनुभव
मोहिमेबद्दल माहिती देताना दापोलीचे सायकलपटू सुनील शिंदे यांनी सांगितले की, दररोज १०० ते १५० किलोमीटर सायकल चालवत अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. प्रवासात विविध गावांमधील ग्रामस्थांनी स्वागत व पाहुणचार केला. या मोहिमेदरम्यान नागरिकांना शिवचातुर्य दिनाचे महत्त्व आणि आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व पटवून दिले असून हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:25 29-08-2026














