सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत वाहतूक डायव्हर्ट; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची अधिसूचना जारी
Ratnagiri Traffic Route Diversion अंतर्गत शहरातील ‘श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’, मारुती मंदिर यांच्यावतीने रविवारी, ३० ऑगस्ट रोजी गणपती मूर्तीची भव्य आगमन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. साळवी स्टॉप ते मारुती मंदिर या मार्गावर सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत निघणाऱ्या या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
Ratnagiri Traffic Route Diversion: बंद मार्ग आणि पर्यायी रस्ते
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने खालीलप्रमाणे वाहतूक व्यवस्था आखली आहे:
- बंद मार्ग: साळवी स्टॉप ते माळनाका ओव्हर ब्रिज (डावी बाजू) या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहतूक ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत पूर्णपणे बंद राहील.
- पर्यायी मार्ग: सर्व वाहनचालकांसाठी साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोड – आयटीआय – अभ्युदय नगर – पॉवर हाऊस – गजानन महाराज मंदिर – सोमेश्वर दुकान – हिंदू कॉलनी मार्गे थिबा पॅलेस रोड ते माळनाका रेस्ट हाऊस असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवांना नियमातून सूट
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच व्हीआयपी दौऱ्यातील अधिकृत वाहनांना लागू असणार नाही. अत्यावश्यक प्रसंगी स्थानिक पोलीस अधिकारी परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतील.
या तात्पुरत्या अधिसूचनेबाबत कोणाचे काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, जेणेकरून पुढील अधिसूचना निर्गमित करताना अशा हरकतींचा योग्य विचार केला जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:17 29-08-2026














