नगर परिषदेच्या पथकाकडून आठवडा बाजारातील टपऱ्यांवर धडक कारवाई; उरलेले खोके टपरीधारकांनी स्वतःहून हटवले
रत्नागिरी :
रत्नागिरी नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवार आठवडा बाजार परिसरात धडक कारवाई करत रस्त्यावरील आणि पदपथांवरील सर्व टपऱ्या हटवल्या आहेत. ६ दिवसांच्या खंडानंतर पुन्हा सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत पथकाने ५ टपऱ्या जप्त केल्या असून, उर्वरित टपऱ्या आणि खोके टपरीधारकांनी स्वतःहून हटवून घेतले आहेत.
साळवी स्टॉप ते मारुती मंदिर टप्प्यानंतर पुढील कारवाई
रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार फुटपाथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्या हटवण्याची मोहीम गेल्या सोमवारी सुरू करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात साळवी स्टॉप ते मारुती मंदिरदरम्यानची अतिक्रणे हटवण्यात आली होती. त्यानंतर सर्वसाधारण सभा आणि शासकीय सुट्ट्यांमुळे ही कारवाई काही दिवस स्थगित झाली होती. सोमवारी पुन्हा या मोहिमेला प्रारंभ करत मंगळवार बाजार परिसरातील सर्व अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या.
कडक पोलीस बंदोबस्तात अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
ही कारवाई मालमत्ता विभागाचे अधिकारी विजय कदम, आनंद थोरात आणि जितेश पवार यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली. नगर परिषदेच्या कामगार वर्गाने घटनास्थळी उपस्थित राहून टपऱ्या हटवण्याची आणि जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 01-09-2026














