कलमांना अवकाळी मोहोर; आंबा बागायतदार चिंतेत.. मुख्य हंगाम पुढे ढकलण्याची भीती
रत्नागिरी:– बदलत्या हवामानाचा आणि अनियमित मान्सूनचा मोठा फटका कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा पिकाला बसला आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच थेट पावसाळ्यातच फुलल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि पावस परिसरातील कातळ भागातील हापूस आंब्याच्या कलमांना वेळेआधीच मोठ्या प्रमाणावर मोहोर आल्याने आंबा बागायतदार तीव्र चिंतेत पडले आहेत.
वातावरणातील बदलाचा फटका
यंदा मान्सूनचा कालावधी अत्यंत अनिश्चित राहिला आहे. जून महिन्यातच कोरड्या दिवसांचा कालावधी अधिक होता, तर ऑगस्ट महिन्यात अनेकदा उन्हाचा कडाका सहन करावा लागला. सलग दोन ते तीन दिवस पावसाने घेतलेली विश्रांती आणि त्यानंतर अचानक पडलेले कडक ऊन यामुळे हापूस कलमांवर विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या हंगामात मे महिन्यात आलेली पालवी जूनमध्ये परिपक्व (मॅच्युअर) झाली होती. आता पावसाच्या उघडीपनंतर पडलेल्या उन्हामुळे या परिपक्व पालवीतून अवकाळी मोहोर बाहेर पडला आहे. कातळभागातील जुन्या व नव्या कलमांवर हे प्रमाण अधिक दिसून येत आहे.
औषध फवारणी आर्थिकदृष्ट्या तोट्याची
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आलेल्या या अवकाळी मोहोरावर सततचा पाऊस, हवेतील दमटपणा आणि कीड-रोगांमुळे फळधारणा होणे कठीण असते. या मोहोरावर कीटकनाशकांची फवारणी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. केवळ बाजारात हंगामातील पहिला आंबा आणण्यासाठी खर्च करणे हा तोट्याचा सौदा असल्याने बहुतांश बागायतदार या मोहोरावर फवारणी न करता त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तर काही बागायतदार ताडपत्रीच्या साहाय्याने मोहोर जपण्याचा प्रयत्न करत आहेत.
उत्पादन घटण्याची अन् हंगाम लांबण्याची शक्यता
हा अवकाळी मोहोर गळून गेल्यास मुख्य हंगामाच्या वेळी झाडांना पुन्हा वेळेत मोहोर येईल का, याबाबत बागायतदारांच्या मनात मोठी शंका आहे. यामुळे आगामी अधिकृत आंबा मोसम पुढे ढकलला जाऊ शकतो किंवा उशिरा सुरू होऊ शकतो. परिणामी उत्पादन घटून बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“पावसाळ्यात हापूस आंबा कलमांना मोहोर येणे हे हवामानातील अनियमिततेचे स्पष्ट उदाहरण आहे. यंदा पावसाने अधूनमधून घेतलेली विश्रांती आणि त्यानंतर पडलेल्या उन्हामुळे झाडांना मोहोर आला आहे. याचा थेट लाभ बागायतदारांना होत नाही; उलट मोहोर मोठ्या प्रमाणात असेल आणि त्याला पुन्हा पालवी आल्यास भविष्यातील मुख्य उत्पादन विलंबाने येईल.” – उमेश रहाटे, आंबा बागायतदार, वाटद-खंडाळा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 01-09-2026














