आरोग्य यंत्रणा सतर्क
खेड:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत कळंबणी (ता. खेड) गावच्या हद्दीत असलेल्या एका ढाब्यावर पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेल्या स्टीलच्या ग्लासात डास आणि डासांच्या अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या भांड्यातच डासांच्या अळ्या आढळल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात असून स्थानिक आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.
जागरूक नागरिकांनी आणला प्रकार निदर्शनास
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे असंख्य नागरिक कळंबणी परिसरातील ढाब्यांवर जेवण व नाश्त्यासाठी थांबतात. त्यामुळे या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि अन्नपदार्थांची स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र कळंबणी हद्दीतील एका ढाब्यावर पिण्याच्या पाण्याच्या यंत्रालगत ठेवलेल्या स्टीलच्या ग्लासात डास व डासांच्या अळ्या आढळल्याचा दावा जागरूक नागरिकांनी केला. हा प्रकार नागरिकांनी तत्काळ ढाबा चालकाच्या निदर्शनास आणून दिला, तसेच आरोग्य सेवक सचिन जाधव व अथांग पवार यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली.
आरोग्य विभाग व अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी स्वच्छ ठेवणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र अशा ठिकाणीच पिण्याच्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळल्याने ढाब्यांवरील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी येथे येत असल्याने संबंधित यंत्रणांनी पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकारानंतर आरोग्य विभागाकडून प्रत्यक्ष तपासणी होणार का, तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 01-09-2026














