Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा १० टक्के कमी पाणीसाठा; मराठवाडा आणि विदर्भात चिंताजनक स्थिती

३१ मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली; १७ धरणे कोरडीठाक, विदर्भ-मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता

कोल्हापूर :
Maharashtra Dam Water Storage च्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील सर्व प्रकारच्या धरणांमध्ये मिळून ऑगस्टअखेर १,३६९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. राज्यातील लहान, मध्यम आणि मोठी अशी एकूण ३०३२ धरणे असून, त्यांची एकूण साठवण क्षमता १७०५ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी याच दिवसांत हा पाणीसाठा १५०० टीएमसीच्या घरात होता. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा जवळपास १० टक्के कमी झाला असून, सध्या पावसाळा अंतिम टप्प्यात असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या स्थितीमुळे यंदा प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्याला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Dam Water Storage: ३१ धरणे १०० टक्के भरली, १७ प्रकल्पांत पाण्याचा खडखडाट

राज्यातील एकूण ३१ मोठी धरणे सध्या पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामध्ये भंडारदरा, निळवंडे (अहिल्यानगर), भाम, भावली, गंगापूर, गिरणा, ओझरखेड, तिसगाव, वाघाड, दूधगंगा, तुळशी (कोल्हापूर), नीरा देवघर, येडगाव, चासकमान, घोड, पवना, भाटघर, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, मुळशी, ठोकरवाडी (पुणे), वारणा (सांगली), तारळी, धोम, कोयना, वीर (सातारा), उजनी (सोलापूर) तसेच बारवी आणि मोडकसागर (ठाणे) या ३१ धरणांचा समावेश आहे.

दुसऱ्या बाजूला १७ धरणे मात्र पूर्णपणे कोरडीठाक पडली आहेत. यामध्ये बोरीगाव-अंजनपूर, डोंगरगाव, सिरसमार्ग, वांगदरी (बीड), दिग्गडी, किनवट (नांदेड), गुंजारगा, किल्लारी, लिंबाळा, मदनसुरी, राजेगाव, सिना कोळेगाव, तागरखेडा (धाराशिव), बिडगीहाळ, कारसा पोहरेगाव, नागझरी आणि शिवनी (लातूर) या १७ धरणांचा समावेश आहे. कोरडेठाक पडलेले बहुतांश प्रकल्प हे मराठवाडा विभागातील असल्याने यंदा त्या भागाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याचे संकेत मिळत आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक

विदर्भातील धरणांची एकूण साठवण क्षमता १३८.१८ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी आजअखेर विदर्भातील धरणांमध्ये ७४.०१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर यंदा हा साठा केवळ ६३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. सुमारे ११ टक्के कमी पाणीसाठा झाल्यामुळे यंदा विदर्भालाही मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई सोसावी लागण्याची चिन्हे आहेत. विभागीय आकडेवारीनुसार कोकणात सर्वाधिक ९०.८४% पाणीसाठा असून, पुणे विभागात ८९.८९%, नाशिक विभागात ८०.६०%, नागपूर विभागात ६३.०६%, अमरावती विभागात ६३.०५% आणि छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे ४९.९१% पाणीसाठा शिल्लक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 02-09-2026